बांदा : काल रात्री सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एक नव्हे तर तीन मंदिरात चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. सर्वप्रथम चोरट्यांनी मडुरा माऊली मंदिराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फंडपेटी फोडून रोकड लंपास केली. त्यानंतर रोणापाल माऊली मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास इन्सुली माऊली मंदिर फोडले. त्यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंदाजे विशीतील दोघे युवक दिसत आहेत. बांदा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बांदा पोलीसांसमोर चोरट्याने पकडण्याचे आव्हान आहे.
कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’
तळकोकणतील मंदिरे काही अपवाद वगळता गाववस्तीपासून दूर असतात. रात्री मंदिरपरिसर निर्मनुष्य असतो. चोरट्यांना ती ईझी टार्गेट वाटायला लागली आहेत त्यामुळे या ठिकाणी चोरीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. चोरीचे प्रकार वाढल्याने अनेक मंदिरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. पण सुरक्षेच्या या उपाययोजना पण कमी पडताना दिसत आहेत.
Facebook Comments Box