अलिबाग:बैलगाडीच्या शर्यतीला शासनाकडून मान्यता तर मिळाली आहे पण प्रेक्षकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ते नियम बनवले नसल्याने या शर्यतींदरम्यान अनेक जीवघेणे अपघात घडताना दिसत आहे. अशाच एका अपघातात बैल उधळून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने अलिबाग येथे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्रकिनार्यावर बैलगाडी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान बैलगाडीचे बैल उधणून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने विनायक जोशी (७०) राजाराम गुरव (७५) हे जखमी झाले. त्यांना अलिबाग येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेताना वाटेतच मृत्यू झाला. तर राजाराम गुरव यांचे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.

Vision Abroad

अलिबाग पोलीस ठाण्यात स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत. बैलगाडी स्पर्धेच्यावेळी घडलेली ही चौथी दुर्घटना असल्याने प्रेक्षकांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे.
