सावंतवाडी : कोकण रेल्वेमार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करून त्याचे नामकरण ”मधु दंडवते” करण्यात यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई यांनी महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
वसई नायगाव नालासोपारा विरार ते डहाणू रोड या भागात कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात आहेत. या विभागातील लोकांना कोकण रेल्वेसाठी दादर किंवा सीएसएमटी स्टेशनला जावे लागते व खूप त्रासही सहन करावा लागतो. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या जलदगतीच्या रेल्वेगाड्या बऱ्याच आहेत. पण या गाड्या कोकणातील काही मोजक्याच स्थानकावर थांबतात. तसेच आरक्षण कोटाही कमी असल्याने त्याचा फायदा येथील कोकणवासीयांना होत नाही.. म्हणून फक्त कोकणवासीयांसाठी वसई ते सावंतवाडी पर्यंत कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने ही स्लो पॅसेंजर रेल्वे सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या या मागणीची रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.
ही मागणी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेकडे मागील काही वर्षापासून केली जात आहे. वसई हे टर्मिनल नसल्याने ह्या रेल्वेची पुर्तता पश्चिम रेल्वेच्या बांद्रा, मुंबई सेंट्रल किंवा अहमदाबाद टर्मिनल वरून करावी. वसईरोड स्टेशनला काही बोगी आरक्षित असाव्यात,तसेच ही रेल्वे नेहमीसाठी व पनवेल ते सावंतवाडी दरम्याने सर्व स्थानकांवर थांबणारी स्लो रेल्वे असावी जेणेकरून कोकणातील सर्व प्रवाशांना याचा फायदा होईल. मागील ५ वर्षे वसई वलसाड किंवा अहमदाबाद वरून सावंतवाडीपर्यंत पॅसेंजर मागत आहोत ती मिळत नाही,
ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशी खंत संघटनेनं व्यक्त केली आहे. तरी कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व लोकप्रतिनिधी यांनी या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा व ह्या रेल्वेची पुर्तता करण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे बोर्डाकडे याची मागणी करावी अशी विनंती अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
गाडीला मधु दंडवते यांचे नाव
कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. त्यामुळेच त्यांच्या नावाने एखादी रेल्वे एक्सप्रेस चालू करावी असा पाठपुरावा चालू आहे. ही नवीन गाडी चालू करून त्यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad