रस्ते, महामार्ग हे विकासाला हातभार लावत असतात. रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढते, व्यापाराची मोठी संधी निर्माण होते. अविकसित असलेल्या खेड्यांचे रूपांतर शहरात होते. मात्र मुंबई गोवा महार्गावरील एका शहराच्या बाबतीत उलट झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गामुळे तळकोकणातील सावंतवाडी या शहराला फायदा न होता तोटा झाला आहे. पूर्वी मुंबई गोवा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र नवीन महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून जात आहे. सावंतवाडी शहरापासून सुमारे १२ ते १४ किलोमीटर अंतरावरून झाराप येथून हा मार्ग मळगाववरून गोव्याला जातो. त्यामुळे नव्या मुंबई गोवा महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराचे झाले आहे.
मुंबईतुन गोव्याला जाणारा मोठा प्रवासवर्ग या मार्गावरून प्रवास करतो. जेव्हा हा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता तेव्हा आपोआपच येथील पर्यटनाची जाहिरात होत असे. जुना राजवाडा, नयनरम्य मोती तलाव आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे पर्यटकांना येथे थांबा घेण्यास भाग पाडत असत. पर्यटक येथे थांबून येथील बाजारपेठेतील लाकडी खेळणी, कोकणी मेवा आणि इतर वस्तू आवर्जून खरेदी करायचे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असे.
मात्र आता चित्र पालटले आहे. महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्यामुळे येथील पर्यटनाची पीछेहाट होत आहे. त्यामुळे या नवीन महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराला झाले आहे. सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणार्या बसेस सुद्धा बायपास मार्गावरून जात असल्याने मुंबई आणि गोव्यात जाण्यास उपलब्ध असणार्या पर्यायांत घट झाली आहे.
हे नुकसान भरून काढण्यासाठी किमान प्रस्तावित संकेश्वर – बांदा महामार्ग तरी या शहरातून जावा अशी जोरदार मागणी होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad