राजापूर, ता. १५: रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश रद्द केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता.
बारसू परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते.जमीन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले होते त्याला विरोध होऊ लागला होता. प्रशासकीय कार्यवाहीत आंदोलनकर्त्यांकडून अडथळे आणले जात होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये मनाई आदेश काढले होते. त्यामध्ये काही व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. बारसू परिसरातील पाणी नमुने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते ते आता रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार देवाप्पा अण्णा शेट्टी ऊर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गुंडू पाटील (रा. परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्नील सीताराम सोगम (रा. पन्हळेतर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण (रा. राम आंनदनगर, हाउसिंग सोसायटी, दहिसर पूर्व-मुंबई) यांचा समावेश आहे. या संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
Facebook Comments Box