खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही व्यक्त केली भीती
Mumbai-Goa Highway |परशुराम घाटातील चौपदरीकरण करण्यासाठी केले जात असलेले डोंगर कटाईचे काम अजून अपूर्ण आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक पावसाळ्यात हे काम चालू असेपर्यंत धोकादायक बनून येथे दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही अशी भीती व्यक्त केली आहे.
डोंगर कटाईचे काम चालू असल्याने येथील काही भाग धोकादायक बनून पहिल्या पावसात केव्हाही दरड कोसळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदार कंपनीस येथील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काम जलद गतीने होण्यासाठी मध्ये घाट काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र डोंगर कटाई करताना मध्येच कठीण कातळ लागले होते. पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीमुळे सुरक्षिततेच्या कारणाने या कातळ भागात सुरुंग लावण्याची परवानगी पण नाकारली गेली होती. यामुळे कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे दिलेल्या अवधीत हे काम पूर्ण झाले नाही.
पावसाळ्यात काम चालू असताना सावधानता म्हणुन कंत्राटदार कंपनीला योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना देण्यात येतील. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यातही वाहनधारकांसह प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच घाटातून प्रवास करावा लागणार आहे असे दिसत आहे.
Vision Abroad