रत्नागिरी :दापोली पालगडमध्ये एका व्यक्तीकडे 20 गावठी बॉम्ब पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, घाडगे, बांगर, एएसआय मिलिंद चव्हाण, विकास पवार यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचून गावठी बॉम्ब घेऊन निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव रमेश पवार असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे.
बॉम्ब बनविण्याचे रॅकेट सक्रिय?
या आधी दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते त्यामुळे तालुक्यात गावठी बॉम्ब बनवणारे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईमुळे हे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
Vision Abroad