चिपळूण :मान्सूनचे आगमन झाले असून, गेले काही दिवस कोकणात सर्वत्र मुसळधार वृष्टी होत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ भरले असून, काही धबधबेही प्रवाहित झाले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. हा धबधबा सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.
मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.
या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो.
धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.
Vision Abroad