रत्नागिरी :कोकणात पावसाचं थैमान सुरूच आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून परशुराम घाटात चार वेळा दरडी कोसळलेल्या आहेत.अशात घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे वीज व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय, जेसीबी व अन्य यंत्रणादेखील सज्ज ठेवली आहे.
बुधवारी परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्या आधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली. त्या पाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परशुराम घाटातील वाहतूक दरड बाजूला करेपर्यंत थांबवण्यात आली होती. त्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी चिरणीमार्गाने वाहतूक वळवली होती; मात्र त्यानंतर तातडीने रस्त्यावर आलेले दगड व माती हटवून आधी एकेरी व त्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परशुराम घाटातील दरडीचा धोका टळलेला नाही. त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घाटातील मध्यवर्ती ठिकाणी दरडीचा मोठा धोका असल्याने तेथे वीज उपलब्ध केली आहे. जेणेकरून रात्री -अपरात्री रस्त्यावर आलेली माती किंवा दगड वाहतूकदारांना सहजपणे दिसावे, असे नियोजन केले आहे. त्याशिवाय दरड हटवण्यासाठी जेसीबी व पोकलेनची व्यवस्था तैनात केली असून, घाटातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे.
Vision Abroad