पोस्ट केले – दिनांक 23 जुलै – 19:30: बचावकार्य थांबवले; ७८ बेपत्ता व्यक्ती मृत घोषित | दुर्घटनेचा सविस्तर अहवाल जाहीर




पोस्ट केले – दिनांक 22 जुलै – 11:30: शोध मोहिमेचा ३ रा दिवस; अजूनही १०७ जण बेपत्ता असल्याची माहिती
रायगड : इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण अजूनही बेपत्ता असल्यचं सांगण्यात येतंय. ८ जखमींवरमीं एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोस्ट केले – दिनांक 22 जुलै – 10:30: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व स्विकारणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त मुलांचे पालकत्व स्विकारणार असण्याचे जाहीर केले आहे. यासंबंधी त्यांनी ट्विटर पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत. शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे. हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पोस्ट केले – दिनांक 21 जुलै – 18:15: मृतांची संख्या 22 वर पोहोचली
ईर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. कालपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला होता.
आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू केलं.आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले. त्यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.
पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 11:15:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घटनास्थळी भेट; दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगून आश्वस्त केले. तसेच दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना त्यांनी पाच लाख रुपयांची मदत केली जाहीर.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर उपस्थित होते .
पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 10:45: आतापर्यंत 75 जणांचे रेस्क्यू
या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर चालू असून अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. पाऊस असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. आतापर्यंत 75 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 08:00 : दरड कोसळून मोठी दुर्घटना
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे.