Express Missed to Passengers : तुमच्या कडे एका गाडीचे आरक्षित तिकीट आहे. गाडी पकडण्यासाठी अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही स्थानकावर पोहोचता आणि तुम्हाला समजते की तुमची गाडी दीड तास अगोदर निघून गेली. किती मनस्ताप होईल तुमचा? असाच मनस्ताप गुरुवारी मनमाड स्थानकावर 45 प्रवाशांना सहन करावा लागला. कारण त्यांची गाडी त्यांना न घेता दीड तास अगोदरच स्थानकावरून रवाना झाली होती.
वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) वास्को येथून हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. दरम्यान या गाडीची मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी 10.30 ही आहे. मात्र, गुरुवारी ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी 9.30 वाजता आली व पाच मिनीटे थांबून पूढे मार्गस्थ झाली.
रेल्वे गाडी नियोजीत वेळेच्या दीड तास आधीच मार्गस्थ झाल्याने या गाडीच्या प्रवासाचे आरक्षण करणारे 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
झालेला प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देवून गोवा एक्सप्रेसचे आरक्षण केलेल्या 45 हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. यावेळी गोवा एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. गीतांजली एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले.
दरडी कोसळत असल्याने मार्गात बदल
सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील हुबळी भागातीलल रेल्वे मार्गावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या नियमीत मार्गाने न जाता रत्नागिरी-रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आल्यामुळे गोवा एक्सप्रेस दीड तास आधीच मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली.
“गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेआधीच पोचल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मार्ग बदलण्यात आल्याने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दीड तास आधीच पोचली. ही रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल” अशी माहिती शिवराज मानसपुरे एका वृत्तवाहिनीला दिली.
Vision Abroad