सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३०७ एसटी बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकातून या गाड्या सुटणार आहेत. या बसेसचे आरक्षण कुठूनही करता येणार आहे. तसेच एमएसआटीसी रिझर्व्हेशन ॲप या ॲपच्या माध्यमातूनही हे आरक्षण करता येते. सध्या आरक्षण सुरू असून ज्येष्ठ नागरीक तसेच महिला व मुलींसाठी सवलतीच्या दरात प्रवास सुविधा उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पाटील म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त रा.प. महामंडळाने आगावू आरक्षण व्यवस्था उपलब्ध केली असून त्याचा लाभ चाकरमान्यांनी घ्यावा. गतवर्षी सिंधुदुर्ग विभागातून २६६ बसेस मुंबई व पुणेसाठी परतीच्या प्रवासाकरीता उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. रा.प. महामंडळाचे आरक्षण ६० दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार परतीच्या प्रवासासाठी मुंबईकरीता १५३ व पुणेसाठी १५४ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दि. २३ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. याशिवाय प्रत्येक दिवशी मुंबई व पुणेला नियमित धावणाऱ्या १३ बसेसही उपलब्ध आहेत..
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने गणेशोत्सवानिमित येणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीची चोख व्यवस्था केली आहे. मुंबई पुणेहून कोकणात सुमारे ५५०० गाड्या येणार आहेत. तर सिंधुदुर्गमधून परतीच्या प्रवासासाठी ३०७ बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेससाठीचे आरक्षणही सुरू झाले आहे. जिल्यातील १८ बस स्थानकमधून या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठीच्या बसेस मुख्य स्थानकांवरून सोडण्यात येत होत्या. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील १८ बसस्टँडवरून या बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील या विविध स्टॅडवरून मुंबई, बोरिवली, भांडूप, ठाणे, कुर्ता ने नगर, निगडी, पुणे, चिंचवड, घाटकोपर, कल्याण, पनवेल अशा ४० मार्गांवर या ३०७ बसेस सोडण्यात येणार आहेत. सन २०१९ मध्ये १५३, सन २०२१ मध्ये २२५ तर सन २०२२ मध्ये २६६ बसेस परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, सिंधुदुर्ग विभागाला १५ ऑगस्टपूर्वी १४ नॉन एसी स्लीपर कोच बसेस कायमस्वरूपी उपलब्ध होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
Vision Abroad