दोडामार्ग : ‘हत्ती हटाओ, दोडामार्ग बचाव’ अशा आक्रमक घोषणा देत दोडामार्ग तालुक्यातील हत्ती (Elephant) बाधित गावातील संतप्त ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या (Forest Department) कार्यालयावर मोर्चा काढला. जोपर्यंत हत्ती हटाओबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशीच भूमिका ग्रामस्थांनी घेत तब्बल सहा तास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर येत्या पंधरा दिवसांत मंत्रालयात हत्ती हटाव संदर्भात वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले.
हत्तींनी केलेल्या नूकसानीने त्रस्त झालेल्या केर, मोर्ले, घोटगेवाडी, कोनाळ, पाळये, सोनावल, हेवाळे, मुळस, बाबरवाडी या ग्रामस्थांनी आज थेट सावंतवाडी गाठत उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आम्हाला भरपाई नको; मात्र हत्तींना आवरा, अशी एकच मागणी लावून धरली. आंदोलकांनी आम्हाला हत्ती हटाव संदर्भात लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली.
शेवटी श्री. राजन तेली यांनी दूरध्वनीवरून थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली तर दीपक केसरकर यांनी वनमंत्र्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेऊन जीआरबरोबरच हत्ती हटाव मोहीम संदर्भात पंधरा दिवसात वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसे लेखी आश्वासनही वन विभागाकडून दिले. त्यामुळे आक्रमक आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतले.
Facebook Comments Box
Vision Abroad