
मुंबई: गणेशोत्सव काळात कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाडीमधील २४ पैकी १० डबे ठाणे स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता या स्टेशनकरीता राखीव ठेवावेत, अशी आग्रही मागणी करणारे निवेदन जल फाउंडेशनच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व व्यवस्थापक, मुंबई विभाग यांना दिले आहे, अशी माहिती जल फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सणांच्या काळात कोकणात कोकण रेल्वेने जाताना आणि परतीच्या प्रवासात खूपच गर्दी असते. गणेशोत्सव हा तर कोकणी माणसाचा आत्मा आहे. गणपती उत्सवाला प्रत्येक कोकणी माणूस गावाकडे मिळेल त्या वाहनाने जातो. कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ दरम्यान अनारक्षित विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी १३ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत सोमवार, बुधवार व शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२ नंतर सुटणार आहे. या गाडीला २४ डब्बे पूर्णपणे अनारक्षित आहेत.घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागातून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांची संख्या लक्षणीय आहे. ते ठाणे येथून प्रवास करतात. त्यांना या गाडीत बसण्यासाठी जागा मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन या गाडीचे २४ पैकी १० डब्बे ठाणे स्टेशनला राखीव ठेवावेत आणि ते ठाणे स्टेशनवर उघडले जावेत, अशी अपेक्षा आहे.
या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचे प्रमुख महाव्यवस्थापक व रेल्वे व व्यवस्थापन -मुंबई विभाग यांना हे निवेदन दिले आहे. दिनांक ९ रोजी मुंबई येथील कार्यालयात ते फाऊंडेशन मार्फत पोचले आहे, असेही श्री. जाधव यांनी सांगितले.
Facebook Comments Box