Railway News : मागच्या ७ वर्षांपासून रखडलेल्या वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत तीन हजार ४११ कोटी १७ लाखांच्या खर्चास शिफारस देण्यात आली आहे. त्यामुळे वैभववाडी -कोल्हापूर या १०७ किलोमीटरचा रेल्वेमार्गाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
पीएम गतीशक्ती अंतर्गत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. याचा मुख्य उद्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग हा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कच्चा, पक्का अशा दोन्ही प्रकारचे शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूकीसाठी मदत होणार असल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक होते.
कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. शिवाय कोकणातील मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
काय आहे ‘पीएम गति शक्ती’ योजना ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी ओक्टोम्बर २०२१ रोजी ‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू केली. मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. सरकारच्या मते, ही योजना भारताच्या पायाभूत सुविधांसाठी गेम चेंजर ठरेल. सरकार या कार्यक्रमात 107 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकारने म्हटले की, गती शक्ती योजना ही मंत्रालयाच्या सर्व विद्यमान आणि नियोजित उपक्रमांचा समावेश असलेला एक मास्टर प्लॅन आहे. यामध्ये आर्थिक क्षेत्र आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. सरकारच्या मते, यामुळे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये प्रादेशिक आणि क्षेत्रीय असंतुलन दूर करण्यास मदत होईल. यासह मुख्य क्षेत्रांच्या जलद वाढीसह रोजगार निर्माण होईल. सरकारचे सर्व पायाभूत प्रकल्प गती शक्ती योजनेत समाकलित केले जातील. सरकारच्या मते, या योजनेमुळे पायाभूत सुविधांच्या विकासातील सर्व अडथळे दूर होतील.
Facebook Comments Box
Vision Abroad