आंबोली: आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध राज्यांसह विदेशातील पर्यटकही भेट देणार आहेत. विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी या निमित्ताने केले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता यावी, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे यासाठी वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास पर्यटकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद प्रेरणादायी आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे
यावेळी आंबोली येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बाहुबली धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक यांच्या हस्ते करण्यात आले. आंबोलीतील पर्यटन वाढावे, यासाठी तब्बल पाच नव्या धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती आले असून त्यापैकी चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुशांत पानवेकर आदींसह शिवसेना व भाजपचे विविध पदाधिकारी, पर्यटक उपस्थित होते.
Facebook Comments Box
Vision Abroad