मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पनवेल येथील निर्धार मेळाव्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांचाकडून टोलनाके आणि कंत्राटदारांची कार्यालये फोडण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र या प्रकारानंतर राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण भलतंच नाराज झाले आहेत. या विषयावर त्यांनी एक पत्र लिहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
पत्रात ते लिहितात
दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.
जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…. ? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे…. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.
मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून … दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे…. अवघ्या महाराष्ट्राला….
कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण हेच आहे, याची देखील जाणीव आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे. भाजपाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.
खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे.
या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे.
ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीर मधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था….त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे…..
आपला,
रविंद्र चव्हाण
Facebook Comments Box
Vision Abroad