- सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही
- सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही
- प्रीमियम /वंदेभारत या गाड्या सावंतवाडीसाठी नाहीत
पनवेल | सागर तळवडेकर : कोकणात रेल्वे यावी यासाठी बापजाद्यांनी राखून ठेवण्यात आलेल्या आपल्या जमिनींचा त्याग करून कोकणवासीयांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. मात्र येथील अनेक स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही, प्रवासी संख्या असूनही अनेक गाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही आहे. एवढे कमी होते म्हणुन की काय आता तर रेल्वे अधिकारी चक्क संतापजनक वक्तव्ये करताना दिसत आहेत.
सावंतवाडी स्थानकात अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि येथील टर्मिनसचे रेंगाळलेले काम पूर्ण करावे यासाठी काल दिनांक २४ ऑगस्ट ला ठरल्या प्रमाणे मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली.
सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे, येथील स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न असताना देखील येथे गाड्या मात्र हाताचा बोटं मोजण्या इतक्याच थांबत आहेत.सध्या कोकण रेल्वे मार्गावर ४४ गाड्या धावतात त्यापैकी सावंतवाडी स्थानकात एकूण ५ दैनिक आणि ४ साप्ताहिक अश्या ९ गाड्या थांबतात.तसेच सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४.४ करोड एवढे आहे आणि आता पुढच्याच महिन्यात गणपती चतुर्थी असल्याने दुसऱ्या तिमाहीत देखील हा आकडा वाढण्याची दाट शक्यता देखील आहे असे असून ही सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांचे अधिकचे पर्याय उपलब्ध नाहीत. अलीकडेच संगमेश्वर आणि खेड ला अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला, हे सर्व लक्षात घेता रेल्वे अभ्यासक मिहिर मठकर आणि कोंकण रेल्वे समन्वयक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ रेल्वे अभ्यासक सुरेंद्र नेमळेकर यांनी नियोजन करून श्री सिन्हा यांची भेट घेतली आणि विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून श्री सिन्हा यांना निवेदन देण्यात आले.
सावंतवाडी टर्मिनस चे उर्वरित टप्पा २ चे काम पूर्ण करणे आणि येथील स्थानकाचा विकास केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे इत्यादी मागणया यावेळी करण्यात आल्या, येथील स्थानकात प्रवाशांची वर्दळ पाहता मंगलोर,मत्स्यगंधा,वंदे भारत,मंगला,नेत्रावती,गोवा संपर्क क्रांती,एलटीटी दुरोंतो,मरूसागर,त्रिवेंद्रम निजामुद्दीन आदी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा तसेच कोरोना काळात थांबा काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव या गाड्यांचा थांबा तत्काळ चालू करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाला अनुसरून बोलताना श्री सिन्हा हे सावंतवाडीकरांचा मागण्यांबद्दल अनुत्सुकच दिसले, त्यांनी सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही असे सांगितले, सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही तसेच प्रीमिअम गाड्या ह्या सावंतवाडी साठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे राजधानी तर नाहीच पण नव्याने चालू झालेली वंदे भारतचा थांबा देखील येथे मिळण्याचा आशा धूसर झाल्यात.टर्मिनस संदर्भात श्री सिन्हा यांना विचारले असता सावंतवाडी टर्मिनस करिता कोंकण रेल्वे कडे निधीची तरतूद नाही असे स्पष्ट केले त्यामुळे तमाम कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा सावंतवाडी टर्मिनस चे भविष्य हे अंधातरीतच आहे असे दिसते. अलीकडेच अनेक प्रवासी संघटना आणि संस्था यांनी या संदर्भात निवेदने सादर केली होती परंतु रेल्वे प्रशासन याची दखल घेत नसल्याची खंत मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी मांडली.
गणेश चतुर्थी ही वीस दिवसांवर येऊन ठेपली असता सोडलेल्या जादाच्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंतच आणि पुढे मडगाव आणि दक्षिणेकडील आहेत त्यामुळे यावर्षी तरी निदान अजुन गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडे होत आहे. सध्यातरी सोडलेल्या गाड्या ह्या अपुऱ्या आहेत अजुन गाड्या सोडून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोंकण रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेली तोंडी उत्तरे ही अपेक्षित नसून याबाबत लवकरच सावंतवाडीकरांना घेऊन भूमिका जाहीर करू असे मिहिर मठकर यांनी सांगितले.दिलेल्या निवेदनात मिहिर मठकर, सुरेंद्र नेमळेकर आणि सागर तळवडेकर यांनी सह्या केल्या होत्या.
Vision Abroad