सिंधुदुर्ग : इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने आज पहाटेच्या सुमारास फोडली. यात ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली खामदेव नाक्यावर श्री गणेश मंदिर समोरील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. चोरट्याने खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन काऊंटरमध्ये ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला.
आज सकाळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्यां समवेत घटनास्थळाची पाहणी केली. मालक दिगंबर बोंद्रे व फॅक्टरीमधील कामगार यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. तसेच कॅश्यु फॅक्टरीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. एलसीबी तसेच श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती एपीआय शामराव काळे यांनी दिली.
Vision Abroad