”सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आले नाही.. अंडरवेअरचे रिटर्न गिफ्ट देवू…. राज ठाकरे यांची तोफ पुन्हा धडाडली

रायगड :आज मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी सरकारवर मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या छळावरून जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतानाच जागर यात्रेला आज सुरुवात केली. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात झाल्यानंतर मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून निघालेल्या या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये झाला. त्यानंतर राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली. 

राज ठाकरे म्हणाले, माझ्या मनसैनिकांनी मुंबई- गोवा महामार्गावरील दुरावस्थेवरुन आंदोलन केले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. मात्र, माझ्या पदाधिकार्यांना, मनसैनिकांना पोलीस स्टेशनमध्ये अंडरविअरवर बसवलं सरकारने. सरकार कोणचंही असू द्या, कालचं असू द्या , नाहीतर आजचं असू द्या. मला त्यांना एवढंच सांगायचंय, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेलो नसतो.

अंडरवेअरचे रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो. पण विचार करा ते दिसतील कसे. कारण यांच्या अंगावरचे खड्डे बघण्यापेक्षा रस्त्यावरील खड्डे बघणे बरे असा टोला लगावतानाच इशाराही दिला. पण सगळ्यांनी असेच जागृत राहा, पुढे काय करायचे ते लवकरच तुम्हांला सांगेन.सगळेच पेपर काय आज फोडायचे नसतात, असेही ते म्हणाले. 

ठाकरे म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी पदयात्रा केली. पदयात्रा हा एक सभ्य मार्ग असतो.आपल्या पक्षाचं धोरणच ते आहे, पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाहीतर हात सोडून जा. आज पदयात्रेने सरकारला काही गोष्टी शांततेनं सांगायच्या आहेत. काय चाळण झाली आहे रस्त्याची. माझ्या कोकणी बांधवांना इतकी वर्ष या महामार्गावरील खड्डे सहन करावा लागत आहे.

इतकी वर्ष तुम्ही हा त्रास सहन करता तुम्हांला राग कसा येत नाही. राग न येता तुम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करत राहता. तीच तीच माणसं तुम्ही निवडून देता. तीच माणसे तुमच्या आयुष्याचा खेळ करुन ठेवतात. या रस्त्यावर आत्तापर्यंत किती अपघात झाले असतील, किती लोकांचे जीव गेले असतील. अरे रस्त्यावरचा खड्डा भरता येतो, पण माणसांचं आयुष्य भरता येत नाही असेही ते म्हणाले.

या रस्त्यावरील अपघातात जे माणसं गेलीत त्यांचं काय असा सवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले, मागील १५ ते १७ वर्षांत मुंबई – गोवा महामार्गावर अडीच हजार माणसे गेली आहेत. गाड्यांची किती विल्हेवाट लागली असेल माहिती नाही. कोणत्या सरकारचा मूर्खपणा आहे, माहिती नाही. त्याच्या हायवेवरती पेईंग ब्लाॅक टाकलेत. किती पैसे खायचेत. याला काही मर्यादा आहे. जगभर कुठेही तुम्ही गेलात तर काँक्रिटचे रस्ते पाहायला दिसतील. पेईंग ब्लाॅक हे फुटपाथवर टाकायचे असतात. पण सारखी कंत्राटं काढायची, नवी टेंडरं काढायची, त्या्च्यावर नवे टक्के घ्यायचे. आणि तुम्हांला दिवसभर या खड्ड्यांवरुन घेऊन जायचं असेही ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग अर्धवट अवस्थेत ठेवण्यामागचा छुपा अजेंडा तुम्हा कोकणी बांधवाना सांगून ठेवतो. हा रस्ता असा ठेवण्या मागचं कारण म्हणजे. अत्यंत चिरीमिरीत तुमच्या जमिनी विकत घेताहेत. अत्यंत मामुली किमतीत जमिनी विकत घेत आहेत. आणि ज्यावेळी हा रस्ता होईल तेव्हा याच जमिनीच्या किमती शंभर पटीने वाढून विकणार. म्हणजे पैसै ते कमवणार आणि तुम्ही तसेच राहणार असेही ते म्हणाले. यात आपलीच लोकं आहेत. आणि कुंपनच शेत खातंय. यात बाहेरची लोक नाहीयेत. ज्यावेळेला दळणवळण चांगलं होतं तेव्हा जमिनीच्या किमती काय पटीने वाढतात हे तुम्हांला लक्षात येईल. त्यामुळे तुमच्याकडच्या जमिनी आहे तशा ठेवा असे आवाहनही ठाकरेंनी यावेळी कोकणवासियांना केले.आज ना उद्या हा रस्ता होईल आणि याची किंमत तुम्हांलाच मिळेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांना मिळेल असेही ते म्हणाले. या व्यापाऱ्यांच्या हाती तुमच्या जमिनी नका घालवू, त्यांना काय रट्टे लावायचेत ते आम्ही लावू असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

मला आठवतं, बाळासाहेब म्हणायचे, तुम्हांला दोन तासांत मुंबई पुणे रस्ता पार करता येईल. असा रस्ता मला बनवायचाय. लोकांना तो जुना रस्ता पाहता ते शक्य होणार नाही असंच अनेकांना वाटायचे. महाराष्ट्र नेहमी पुढारलेलाच होता. आणि देशाला दाखवण्याचे काम नेहमीच महाराष्ट्राने केले. मुंबई पुणे महामार्ग झाल्यावर देशाला कळले की, असा रस्ता होऊ शकतो.

बाळासाहेबांच्या संकल्पनेतून आणि नितीन गडकरीं(Nitin Gadkari)च्या पुढाकारातून हा मुंबई पुणे महामार्ग झाला. आणि मग असे रस्ते व्हायला सुरुवात झाली. त्या महाराष्ट्रातला मुंबई पुणे महामार्ग असा, हालरस्ता असा का, याच्यामध्ये असे खड्डे का, वर्षानुवर्षे हा रस्ता असा का? याचं उत्तर सोपं आहे, की आपण त्या त्या व्यक्तींनाच निवडून देतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search