Mumbai Goa Highway :रत्नागिरी व रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गाने कोकणात येणार्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४ ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात १० ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष सज्ज केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून गणेशभक्त कोकणातील आपल्या गावी येण्यासाठी सुरवात होईल. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १० लाख चाकरमानी दाखल होतील, असा अंदाज जिल्हा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी पोलिस चौकी सज्ज असणार आहेत. रत्नागिरी जिल्हा आढावा घेणारी बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ३९ ऑगस्टला घेतली. जिल्ह्यात एकूण १४ ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष व्यवस्था करण्यात येणार आहे.
कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत तसेच आंबाघाट येथे ही व्यवस्था असणार आहे. रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन करताना गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्याकरिता दहा ठिकाणी चौक्या सज्ज असणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली. खारपाडा पोलिस चौकी, पेण वाहतूक चौकी, वडखळ वाहतूक चौकी, वाकण वाहतूक चौकी, कोलाडनाका वाहतूक चौकी, माणगांव वाहतूक चौकी, लोणेरे वाहतूक चौकी,नातेखिंड महाड चौकी, पोलादपूर वाहतूक चौकी, पाली वाहतूक चौकी या सगळ्या ठिकाणी वाहतूक स्वागतकक्ष सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव स्वागतासाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी बुधवारी (ता. ६) आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे तीन तालुके हे महामार्ग कक्षेत येतात.
क्रेन, रुग्णवाहिकेची सुविधा
गणेशोत्सव काळात भक्तांसाठी महामार्गावर असलेल्या सर्व स्वागत कक्षाच्या ठिकाणी वायरलेस सेट, क्रेन, रुग्णवाहिका या सुविधा सज्ज असणार आहेत, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.