नवी मुंबई : गणेशोत्सव काळात कोंकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून चाकरमाने कोकणात मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात या बैठकीत आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे
तसेच राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Vision Abroad