सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.