Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या कामाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आगामी चार ते पाच दिवसांमध्ये बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आली होती. या बोगद्यातून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे कोकणवासियांना मोठा फायदा झाला होता.
गणेशोत्सवाच्या काळात कशेडी घाटातून एकेरी मार्गिकेवरून वाहतूक सुरू असल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता या बोगद्यातून वाहतूक चार ते पाच दिवसात बंद करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या उर्वरित कामाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जानेवारी 2024 पर्यंत कशेडी बोगदा आणि त्यापर्यंत पोहोचण्याच्या दोन्ही मार्गिका पूर्ण करून तेथून वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग प्रयत्न करत असल्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.
नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येत होते. हे अंतर पार करण्यासाठी घाटातील अवघड वळणांमुळे जवळपास अर्ध्या तासाचा कालावधी लागत होता. आता कशेडी बोगद्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी येत्या काही दिवसात बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
Facebook Comments Box