“सावंतवाडी टर्मिनस” व्हावे यासाठी कोकणी माणूसच आग्रही नाही?

सागर तळवडेकर |सावंतवाडी :या वर्षीचा गणेशोत्सवात चाकरमानी आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रमाणात रेल्वे प्रवास करत आपल्या गावी पोहोचलो खरे,परंतु चाकरमान्यांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, रेल्वे प्रशासनाला एकेरी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.अनेकांना ४-५ तास स्टेशन वर ताटकळत उभे राहावे लागले, गाडीतील अस्वच्छता, पाण्याची असुविधा, सदोष बोगी संरचना आदी, अनेक छोट्या मोठ्या अडचणी ह्या सर्व चाकरमान्यांना येताना आणि मुंबईला परतताना सहन कराव्या लागल्या, आणि पुन्हा एकदा कोकणात स्वतंत्र असे टर्मिनस व्हावे ही जुनी मागणी डोळ्या समोर आपसूकच आली.
पण दुदैर्व.. “सावंतवाडी टर्मिनस” व्हावे असे कोकणी माणसाला वाटतच नाही असेच दिसते. चाकरमाण्यांपासून मालवणी माणूस देखील याला अनुकूल नाहीच असे दिसते. सावंतवाडीत टर्मिनस व्हावे यासाठी पहिल्यांदा कै. वालावलकर,आणि स्वतः कोकण रेल्वेचे जनक कै. मधु दंडवते यांनी नियोजन केले, त्यांनतर २००६ पासून समाजवादी आमदार कै. जयानंद मठकर, त्यांनतर कै. डी के सावंत यांनी अथक प्रयत्न केले, पत्रव्यवहार केले आणि त्याची पायाभरणी बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा पुढे नेणारे माजी खासदार श्री सुरेश प्रभू यांनी २०१५ ला केली. परंतु हे टर्मिनस आता निधी अभावी रखडणार आहे हे माझ्यासारख्या टर्मिनस प्रेमीला कितपत पचनी पडेल हे सांगता येत नाही. टर्मिनस साठी निधी नाही हे सांगत खासदार महोदयांनी आपले हात वर केलेत असेच काही दिसते आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे बोलणे कितपत योग्य आहे हे येणारी निवडणुकीच ठरवेल.
काही जणांना टर्मिनस म्हणजे काय हे देखील माहित नसेल, त्यांसाठी मी थोडी त्याबद्दल माहिती देतो,रेल्वेचे टर्मिनस ज्या ठिकाणी प्रस्तावीत होते म्हणजेच त्या ठिकाणाहून रेल्वे सुरू करण्याचे / सोडण्याचे नियोजन करण्यात येते, रेल्वे सोडताना तेथे रेल्वे उभी करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, रेल्वे बोगी धुण्याची सोय, पाणी भरण्याची सोय, आदी कामे केली जातात. जेणेकरून भविष्यात या टर्मिनस वरून काही गाड्या ह्या चालवण्यात येतील, त्या गाडीची देखभाल केली जाईल. ही सर्व कामे सध्या गोव्यातील मडगाव येथे केली जातात,परंतु सध्याचा घडीला मडगाव स्टेशन हे गणेशोत्सवातील किंवा इतर मोठ्या सण किंवा उत्सवाला अतिरिक्त भार घेण्यास सक्षम   नाही. त्यामुळे कोकणातील या गर्दीचा भार उचलण्याचे काम सावंतवाडी टर्मिनस ने नक्की केले असते, जेणेकरून स्पेशल गाड्यांचे / दुप्पट दरात तिकिटे काढून प्रवास करणाऱ्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागला नसता. म्हणून मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की टर्मिनस, ते देखील रेल्वेचे टर्मिनस होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर प्रवासादरम्यान असे वाईट अनुभव हे येतच राहतील.
माझ्या मते हा विषय केवळ सावंतवाडी पुरती मर्यादित नसून हा मुंबई आणि कोकण या दोन्ही भागांचा आहे कारण कोकणातील अर्धी मंडळी ही मुंबईला पोटापाण्यासाठी आहे आणि ही मंडळी आपला प्रत्येक सण आपल्या घरी म्हणजेच कोकणात येऊन साजरे करतात त्यामुळे ह्या जिव्हाळ्याचा विषयाला आज आलेल्या खासदारांचा विधानाने कुठेतरी कोकणी माणूस दुखावला असेल असेच दिसते. मी पुन्हा एकदा सांगतो की सावंतवाडी टर्मिनस होणे ही आजची खरी गरज आहे. आपण सर्वांनी यावर विचार करावा ही विनंती

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search