रायगड: महाड येथील चवदार तळे व आजूबाजूचा परिसर आता सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार असल्याचे महाड नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.
महाडमध्ये २० मार्च १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरोधात सामाजिक न्यायासाठी लढा दिला होता. या सत्याग्रहानंतर चवदार तळे जगाच्या नकाशावर आले. महाड नगरपालिकेने चवदार तळ्याचा इतिहास जपण्यासाठी १९८७ मध्ये तळ्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले होते.
चवदार तळ्याच्या भिंती नव्याने बांधण्यात आल्या असून तळ्याच्या काठी सभागृह बांधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता, त्या पायऱ्यांचे देखील सुशोभीकरण केले आहे. तळ्याच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे व दोन्ही बाजूला उद्याने विकसित करण्यात आली आहेत. चवदार तळ्यावर वर्षभर असंख्य अनुयायी व पर्यटक भेट देतात. शिवाय दरवर्षी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन, मनुस्मृतिदिन, डॉ. आंबेडकर जयंती व पुण्यतिथी यानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.
तळ्याच्या सुशोभीकरणांमध्ये आणखीन भर पडावी, या दृष्टीने महाड नगरपालिकेने आता चवदार तळे व परिसरामध्ये सजावटीचे दिवे व आकर्षक दिव्यांचे खांब उभारण्यास सुरुवात केली आहे. तळ्याच्या चारी बाजूने तसेच दोन्ही उद्यानांमध्ये ११० खांब उभारण्यात आले आहेत. खांबांवर नक्षीदार असे सजावटीचे दिवे लावले जाणार आहेत. या दिव्यांमुळे चवदार तळ्याचा परिसर आणखीनच उठून दिसेल. महानगरपालिकेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हे दिवे बसवण्यास सुरुवात केली आहे.
Facebook Comments Box