कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आंजिवडे येथे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा साडेआठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या भागात काही प्रमाणात यंत्रसामग्री आणण्याचीही तयारी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, जिल्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आंजिवडे गावाचाच भाग असलेल्या वाशी येथे हा प्रकल्प होणार असून यासाठी १४० हेक्टर जमीन संपादित करणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील धरणाचे पाणी खाली आंजिवडे येथे आणून यातून २१०० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती होणार आहे. १४० हेक्टर क्षेत्रांपैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा केला जाणार आहे.येत्या पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरुवात होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीही या ठिकाणी प्रयत्न होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्पाला कोणतीही आडकाठी आलेली नाही. अदानी समूहाने दिल्लीत आपली ताकद वापरून वनखात्याकडून ७०४ हेक्टर जमीनदेखील मिळवली असून, या प्रकल्पाला लागणारी १४० हेक्टर जमीन पूर्णतः संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या एका अग्रगण्य वर्तमान पत्राने सुद्धा याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. मात्र इतकी गोपनियता का पाळली जात आहे? याचे कोडे मात्र कायम आहे.
आंजिवडे येथून पाटगावमार्गे कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटरस्त्याची अनेक वर्षे मागणी होत आहे. हा रस्ता झाल्यास कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर कमी होणार आहे. फार कमी घाट फोडून हा मार्ग होऊ शकतो; मात्र वनजमिनीच्या प्रश्नामुळे हा घाट रस्ता लोकांची मागणी होऊनही प्रत्यक्षात आला नव्हता; मात्र अदानींच्या या नियोजित प्रकल्पासाठी शेकडो एकर वनजमीन संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad