मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून जाणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad