आंबोली: परप्रांतीय मोठ्याप्रमाणात कोकणात जमिनी विकत घेत आहेत. एक चांगली गुतंवणूक म्हणून जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. तर काही बांधकाम व्यावसायिक जमिनी विकत घेऊन तेथे इमारतीची बांधकामे करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असून कोकणच्या निसर्गाला हानी पोहचत आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोली येथेही असेच प्रकार चालू असल्याने येथील ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. काल दिनांक ३१ जानेवारीला आ बोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आंबोलीतील गावठण फौजदारवाडी ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी बाहेरच्या तसेच परप्रांतीय लोकांना जमिनी विकण्यास मज्जाव करण्याबाबत ठराव घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षरींचे निवेदन दिले. जमीन ही गावची असल्याने विकण्याचा कोणाला अधिकार नाही, असा ठराव घेण्यात आला. आंबोलीतील बाकी वाडीतील ग्रामस्थांनाही गावातील जमीन विक्रीला पायबंद घालण्याची मागणी केली आहे.
गावातील १५ एकर जागा परस्पर विकल्याचा आरोप
आंबोली असलेला कबुलायतदार गावकर जमिन प्रश्न शासन दरबारी सुटण्याच्या मार्गावर असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर हिरण्यकेशी रस्त्यालगत १५ एकर जागा गावाबाहेरील व्यक्तींना काही स्थानिकांनी परस्पर विकल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. संबंधित जागेत जेसेबीने सपाटीकरण सुरू आहे. याविरोधात गावठण ग्रामस्थांनी एल्गार केला असून ते अतिक्रमविरोधात एकवटले. प्रशासनाला स्वाक्षरींचे निवेदन देऊन जिल्ह्याधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करावे; अन्यथा आंबोली ग्रामस्थांतर्फे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गावातील १९९९ नंतर विकलेल्या सर्व जागेचा सर्व्हे व्हावा तसेच तलाठी कार्यालयात भ्रष्टाचार करून घातलेल्या नोंदी काढून टाकाव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ यावर आदेश काढून पंचनामे करावेत आणि गाव वाचवावे, अशी मागणी गावठणवाडी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, सरपंच सावित्री पालेकर, सदस्य काशीराम राऊत, ग्रामसेवक संदीप गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, प्रकाश गुरव, बबन गावडे, बाळकृष्ण गावडे, अंकुश राऊत, कांता गुरव, प्रथमेश गावडे, मोतीराम सावंत, रंजना गावडे, काशीबाई गावडे, सुनील राऊत, दीपक मेस्त्री, शंकर गावडे, अमित गुरव, राकेश अमृस्कर, झिला गावडे आदी उपस्थित होते.
Facebook Comments Box
Vision Abroad