सावंतवाडी, दि. १८फेब्रु.: कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली येथे शिकार करण्यासाठी आलेल्या सहाजणांना काल आंबोली पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात उपोषण सुरू त्या स्थळापासून पोलिसांनी १४९ नोटीस दिलेली असतानाही केवळ १०० मीटर वर शिकारीच्या उद्देशाने हा गोळीबार झाला. या ठिकाणी सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हे स्वतः बंदोबस्तासाठी होते. गोळीबार नंतर आंबोली हिरण्यकेशी पर्यटन टोल नाक्यावर ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि एकूण ६ जणांना पकडून त्यांना पोलीस व वन विभागाच्या ताब्यात दिले. यात सावंतवाडीतील एक वकील आणि अन्य पाच जणांचा समावेश आहे. संबधितांच्या चारचाकी वाहनात बंदूक,काडतुसे,रक्त लागलेला सुरा सापडले असून ,सुरीला लागलेले ,रक्त व केसांचा पंचनामा पोलीस आणि वनविभाचे अधिकारी यांनी केला.या संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात आली. तपासाअंती त्यांनी साळींदर ची शिकार केल्याचे समोर आले.
मात्र उपोषण स्थळापासून केवळ शंभर मीटर वर गोळीबार झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. काल इथे उपोषण असल्याने हा प्रकार उघडकीस आला. सावंतवाडी ते आंबोली या मार्गावर दाणोली या ठिकाणी पोलिसांचा तपासणी नाका आहे. या तपासणी नाक्यावर योग्य प्रकारे तपासणी होत नाही आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. अतिक्रमण आणि शिकार यामुळे येथील अनेक प्राण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Facebook Comments Box