सिंधुदुर्ग :दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे . दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे.
दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.
तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.
Vision Abroad