दोडामार्ग, दि. २० मार्च २०२४:चार दिवसांपूर्वी तळकट-खडपडे दरम्यान एक पट्टेरी वाघ आढळला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या भागात पट्टेरी वाघांचे अस्तित्व अधोरेखरेखील झाले असून हा भाग इको सेन्सेटिव्ह झोन (संवेदनशील भाग) जाहीर करावा या मागणीला बळ मिळाले आहे. वन विभागाला सुद्धा तिलारी ते आंबोलीपर्यंतच्या पट्ट्यात सहा वाघांचे अस्तित्व असल्याचे मान्य करावे लागले आहे.
मांगेली ते राधानगरी अभयारण्यपर्यंतच्या सह्याद्री पट्ट्यात बावीस पट्टेरी वाघांचे अस्तित्व राष्ट्रीय संशोधन अनुसंज्ञान संस्था देहराडून यांच्या सर्वेक्षणात आढळले असतानाही वनविभाग ते नाकारत होते. तालुक्यात तळकट-खडपडे दरम्यान आढळलेल्या पट्टेरी वाघामुळे वन विभाग उघडा पडला आहे. त्यांना तिलारी ते आंबोलीपर्यंतच्या पट्ट्यात सहा वाघ अस्तित्वात असल्याचे मान्य करावे लागले. यामुळे हा भाग इको सेन्सेटिव्ह झोन (संवेदनशील भाग) जाहीर करावा, यासाठी उच्च न्यायालयात वनशक्ती संस्थेने दाखल केलेल्या याचिकेला भक्कम पुरावा मिळाला आहे, असा दावा याचिकाकर्त्या वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
वनशक्ती संस्थेने मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असून तो भाग संरक्षित करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. दीर्घकाळ यावर सुनावणी सुरु आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याचे वन शक्तीने वेळोवेळी उच्च न्यायालयात सांगितले होते. वाघाचे वास्तव्य चार दिवसांपूर्वी मिळालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे सिद्ध झाले. त्यामुळे या संदर्भात न्यायालयाला पुरावा सादर करण्याच्यादृष्टीने श्री. दयानंद आणि त्यांची टीम तळकट-खडपडे येथे गेली होती. तेथे त्यांना पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. या संदर्भात त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने २०१३ ला दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी लागू केली असतानाही तेराशे एकर जमिनीत वृक्षतोड झाली आहे. जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक याला जबाबदार असल्याने त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत संदिप सावंत, नंदकुमार पवार उपस्थित होते.
Facebook Comments Box
Vision Abroad