अलिबाग– अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर मंदिरालगत असलेल्या जंगल परिसरात दुर्मिळ अशा वाघाटी रानमांजराचे Rusty Spotted Cat प्रथमच दर्शन झाले आहे. सर्वात लहान आकारातील मांजरांची प्रजाती म्हणून ही मांजर ओळखली जाते.
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य अदिती सगर आणि समीर पालकर हे कणकेश्वर मंदीर परिसरालगतच्या जंगल परिसरात भ्रमंती करत असताना त्यांना ही मांजर आढळून आली. रस्टी स्पॉटेड कॅट नावाने ओळखली जाणारी ही मांजर यापूर्वी कधीही अलिबाग लगतच्या परिसरात आढळून आली नव्हती.
ही रानमांजर प्रामुख्याने ओल्या दमट पानगळीच्या जंगलात आढळून येते. राज्यात ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात या मांजरांचे वास्तव्य आढळून आले आहे. वाघाटीच्या चेहऱ्यावर दोन गडद पांढऱ्या रेषा, तर चार गडद काळ्या रेषा असतात. सदर रेषा या नाकापासून वर डोक्यापर्यंत स्पष्ट असतात. या मांजरीचे डोळे खूप मोठे असतात आणि त्यांच्या बुबुळांचा रंग निळसर ते राखाडी तपकिरी असतो. त्यांचे कान गोलाकार आणि लहान असतात आणि पाठीवर राखाडी ठिपके असतात. वाघाटी प्राणी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे नामशेष होण्याची भीती असलेल्या यादीत आहे. मार्जारकुळात समावेश असलेल्या वाघाटीचा समावेश नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांमध्ये होतो.
Facebook Comments Box
Vision Abroad