कणकवली, दि.०१ : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी आज कणकवलीतून रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली. उद्या त्याला येथील न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. त्या तरूणाने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर रेल्वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या संशयित तरूणाची माहिती घेऊन सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.
रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त समजल्यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रेल्वे तिकीट विक्री आणि बुकींग प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून संशयित तरूणाची चौकशी सुरू आहे. तिकीट बुकिंग साठी वापरला जाणारा मोबाईल, कॉम्प्युटर आदी साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयित अधिक चौकशी करून त्याला मंगळवारी न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.