उत्पन्नाच्या बाबतीतही सावंतवाडी रेल्वे स्थानक सरस.. 

   Follow us on        

आवाज कोकणचा | सागर तळवडेकर : गेल्या वर्षी मी लिहिलेला मालवणी माणूस आणि रेल्वे हा उत्पन्नासंदर्भात लेख प्रचंड व्हायरल झाला होता त्याबद्दल सर्वांचे अजूनही आभार.

त्याच प्रमाणे आज मी कोकण रेल्वे मार्गावरील आर्थिक वर्ष २०२३-२४ चे प्रत्येक स्थानकाचे प्रवासी उत्पन्न आणि प्रवासी संख्या या ठिकाणी मांडणार आहे. हा सर्व डाटा माझा नसून माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून मिळविलेला आहे. प्रत्येक स्थानकावर प्रवासी सुविधा ही त्या स्टेशनच्या वापरावर अवलंबून असते. ज्या ठिकाणी जास्त प्रवासी वर्दळ आणि त्यापासून मिळालेले उत्पन्न,त्या ठिकाणी जास्त सुविधा.

आज मी ह्या माहितीच्या आधारे काही तथ्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला काही यातील जास्त माहिती नाहीय परंतु जेवढे समजते तेवढे मांडण्याचा नक्की प्रयत्न करतोय.

सावंतवाडी स्थानकाचे मागील आर्थिक वर्षी म्हणजेच २०२२-२३ ला १३ कोटी ४२ लाख एवढे होते.आणि एकूण प्रवासी संख्या ही ०६ लाख ९४ हजार एवढी होती. म्हणजेच प्रतिदिन सरासरी १९०२ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला.

या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३-२४ ला सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे आहे. येथील प्रवासी संख्या ही ०७ लाख ७९ हजार एवढी आहे. आणि प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला. या माहितीच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२६ कोटीने रुपयांनी वाढले,आणि एकूण प्रवास करणारे प्रवासी ८५ हजार ने वाढले म्हणजेच प्रवासी संख्या सरासरी प्रतिदिन २३२ ने वाढली देखील. परंतु या असे असताना देखील या स्थानकात नवीन एकही गाडीचा थांबा देण्यात आला नाही. कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस आणि कोचिवेली गरीबरथ एक्स्प्रेस चा थांबा देखील पुन्हा देण्यात आला नाही. आता अजून स्पष्ट समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ३ स्थानके अनुक्रमे कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी.

कुडाळ स्थानकाचे उत्पन्न हे ३१ कोटी ६३ लाख एवढे आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ३.१ कोटी रुपयांनी ते वाढले. या ठिकाणी एकूण १६ गाड्या म्हणजेच ७ दैनिक, एक प्रीमियम गाडी तेजस एक्स्प्रेस, जी आठवड्यातून ५ दिवस धावते, अजून एक प्रीमियम गाडी मडगाव राजधानी,जी आठवड्यातून २ दिवस धावते,५ साप्ताहिक गाड्या आणि २ स्पेशल गाड्या ज्या बरीच वर्षे स्पेशल म्हणून धावतात त्या मधे नागपूर मडगाव एक्स्प्रेस आणि जबलपूर कोइंबतूर एक्स्प्रेस चा समावेश आहे. ह्या गाड्या अप आणि डाऊन अश्या दोन्ही बाजूला धावत असल्याने त्यांचा एकूण फेऱ्या एका आठवड्यात ह्या १२८ एवढ्या आहेत.

कणकवली स्थानकाचा विचार केल्यास ह्या वर्षी कणकवली स्थानकाचे उत्पन्न हे ३० कोटी ६५ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीचा तुलनेत हे ०४.५२ कोटी रुपयांनी हे वाढले या ठिकाणी एकूण १५ गाड्या (वंदे भारत पकडुन) थांबतात. या मध्ये ७ दैनिक, एक प्रिमियम गाडी वंदे भारत, एक आठवड्यातून ४ वेळा धावणारी (पावसाळ्यात आठवड्यातून दोन वेळा), २ गाड्या आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या, आणि २ साप्ताहिक व दोन स्पेशल गाड्या (कुडाळ ला थांबतात त्याच) थांबतात. या गाड्यांचा दोन्ही बाजूने फेऱ्या असल्याने या ठिकाणी आठवड्यातून एकूण १२४ फेऱ्या (वंदे भारत वगळून, कारण या ठिकाणी ही ट्रेन नवीन सुरू केली असून वंदे भारतच्या वर्ष भरात केवळ १८० फेऱ्या झाल्यात. त्या पकडल्या तर कुडाळ पेक्षा जास्त फेऱ्या होतील.)

सावंतवाडी स्थानकाचा विचार केल्यास या ठिकाणी एका आठवड्यात एकूण ९२ (८८ – ९२ फेऱ्या, त्यातील एक गाडी पावसाळ्यात आठवड्यातून २ दिवस धावते आणि इतर वेळी ४ दिवस धावते) फेऱ्या होतात. आणि या ठिकाणी एकाही प्रीमियम दर्जाच्या गाडीला थांबा नाही.

असे असताना देखील येथील प्रवासी संख्या आणि उत्पन्न हे कमालीचे वाढले आणि भविष्यात ते वाढत जाईल. या ठिकाणी अजून एखादी नवीन दैनिक गाडी, एक प्रिमियम दर्जाची गाडी आणि एक साप्ताहिक गाडी चा थांबा दिल्यास आताच्या उत्पन्नात अधिक भर पडेल हे नक्कीच..

परंतु कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड थांबे देण्यासाठी आणि थांबे काढून घेण्यासाठी फक्त सावंतवाडी साठी असा कोणता निकष लावते ते माझ्या तरी समजण्याचा पलीकडे आहे. आम्ही गेल्या वर्ष भरात या ठिकाणी मंगलोर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर मडगाव एक्स्प्रेस किंवा दिल्ली ला जाणाऱ्या एर्नाकुलम – निजामुद्दीन एक्स्प्रेसचा थांबा मिळावा म्हणून कृतिशील पणे कोकण रेल्वे महामंडळ, खासदार, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री आणि रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा करतच आहोत तरी देखील आम्हाला यश आले नाही. आंदोलन करून देखील थांब्यासंदर्भात काही हालचाल होताना दिसत नाही.

परंतु आम्ही देखील हार मानणारे नाहीत. आमच्या हक्काचे एकूण तीन थांबे या स्थानकातून हया नाहीतर त्या कारणाने काढून घेण्यात आले, आम्ही देखील तीन थांबे मिळवण्यासाठी मेहनत घेऊच. रेल्वे जर बिझनेस बघते तर तो सावंतवाडीला आहे.

परंतु सावंतवाडीकडे रेल्वे का बघत नाही हाच माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न आहे.येणाऱ्या काळात सावंतवाडीकरांचा भावनांचा उद्रेक नक्कीच होईल हे लक्षात असूद्या.आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर शेअर नक्की करा.धन्यवाद.

सागर तळवडेकर

उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search