मुंबई: बोरिवली दहिसर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकरांची वस्ती आहे. मात्र त्यांना कोकणात गावी जाण्यासाठी दादर गाठावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी बोरिवली येथून विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याबाबत आपण केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असल्याचेही ते बोलले. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना केंदीय वाणिज्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये त्यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद कार्यक्रम झाला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर, आमदार अतुल भाटखळकर, विकास भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, उत्तर मुंबईचे निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते.