



मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नातून नव्याने चालू करण्यात येणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचे उद्घाटन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून त्यादिवसापासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.
या पूर्वी ही गाडी दिनांक २४ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे पक्ष कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. या गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर विभागांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यात वेळ लागत असल्याने या गाडीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक दीड वाजता ही गाडी बोरिवली येथून मडगावसाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्यानंतर ही २० डब्यांची गाडी वांद्रे – मडगाव दरम्यान आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येणार आहे. आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या उद्घाटन सोहोळ्यास उत्तर मतदारसंघातील कोकणकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पक्षाच्या वतीने सुनील राणे यांनी केले आहे.