



चिपळूण:- श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, यांच्या वतीने मजरे दादर, कळकवणे येथे दसपटी विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या श्री समर्थ अविनाश शिंदे कळकवणे (आय. ए. एस), कु. हरिज्ञा लक्ष्मण शिंदे ओवळी (नेव्ही अधिकारी), श्री अथर्व श्रीधर कदम टेरव (सी. ए.), कु. स्नेहा अरूण शिंदे कळकवणे (सी. ए.), श्री शुभम शशिकांत शिंदे कोळकेवाडी (कबड्डी क्षेत्रात विशेष प्राविण्य), डॉ. सलोनी सुभाष शिंदे तिवरे (एम.बी.बी.एस.), श्री कृपाल दिलीप शिंदे कोळकेवाडी (पी. एच.डी. डॉक्टरेट परीक्षेत विशेष प्राविण्य), कु. अनुजा अनिल चव्हाण मोरवणे (डॉक्टरेट इन फिजिओथेरपी), श्री निलेश कृष्णाजी शिंदे कळकवणे (वैद्यकीय क्षेत्रात विशेष पुरस्कार) प्राप्त केलेल्या या नवरत्नांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व दसपटीभूषण, दसपटीरत्न असे सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सदर किर्तींवंतांचा गौरव करताना न्यासाचे अध्यक्ष श्री प्रतापराव शिंदे यांनी सांगितले की या गुणवंतांनी घेतलेले कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य तसेच आईवडिलांचे व कुलस्वामिनी रामवरदायिनी- भवानीचे आशीर्वाद यामुळेच त्यांना हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या समाजाचेही काही देणे लागतो याचा विसर पडू देवू नये असा मोलाचा सल्ला दिला.
गुणवंतांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे गुणगौरव सोहळे अनेक झाले पण आई रामवरदायिनीच्या प्रांगणात आमच्या समाज बांधवांनी केलेला सन्मान आमच्यासाठी विशेष आहे व त्यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.
या सन्मान सोहळ्यास न्यासाचे विश्वस्त, व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, दसपटी विभागातील मान्यवर तसेच आदरणीय समाज बांधव उपस्थित होते.