संपादकीय: वांद्रे टर्मिनस येथे काल पहाटे गाडीमध्ये चढताना चेंगराचेंगरी होऊन प्रवासी गंभीररीत्या जखमी होण्याचा प्रकार घडला होता. घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा घटनेचे गांभीर्य दाखवते.
वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पूर्ण अनारक्षित स्वरुपाची होती. या गाडीच्या आसन क्षमतेपेक्षा तिकीटविक्री झाली होती. गाडी प्लॅटफॉर्म येत असताना जागा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. या वेळी चेंगराचेंगरी होऊन 9 प्रवासी जखमी झाले. त्यात 2 दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले.
या घटनेनंतर या घटनेस जबाबदार कोण? कारणे काय? हे प्रश्न उठले. अन्य कारणे अनेक असतीलच मात्र मागणी – पुरवठा यातील तफावत हेच या घटने मागचे मुख्य कारण म्हणता येईल. देशातील प्रवाशांची मागणी कोणती आहे हेच ओळखणे प्रशासनाला जमले नाही; किंवा ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. देशातील प्रवाशांचा मोठा गट सामान्य आणि गरीब या प्रकारात मोडतो. या प्रवाशांना एसी आणि प्रिमीयम श्रेणीतून प्रवास प्रवास करणे परवडत नाही. एकतर जनरल नाहीतर स्लीपर या श्रेणीची तिकिटे त्यांना परवडतात. त्यामुळे प्रीमियम वंदे भारत, तेजस, राजधानी या सारख्या पूर्णपणे प्रिमीयम त्यांच्यासाठी नाहीच आहेत. आता राहिल्या बाकीच्या रेग्युलर गाड्या. या गाड्यांना फक्त 2 ते 4 जनरल डबे जोडलेले असतात, तर साधारणपणे 8 ते 10 सेकंड स्लीपर डबे या प्रवाशांसाठी असतात. ही संरचना प्रत्येक गाडीपरत्वे कमी अधिक असल्याने आपण ती आपण साधारणपणे 50% पकडून चालू. देशातील मोठ्या प्रवासगटाला ही क्षमता नक्किच कमी आहे.
रेल्वे प्रशासनाने अलीकडेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कालची घटना याच निर्णयाचा एक परीणाम आहे. यापूर्वी प्रवाशांना वेटिंग तिकीटावरून स्लीपर डब्यांतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होता. तो आता नाहीसा झाल्याने जनरल डब्यातील गर्दी वाढली. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास, हे चित्र असेच राहिल्यास भविष्यातही अशा घटना घडतच राहणार.
रेल्वे प्रशासन सध्या उत्पन्न वाढीवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे वंदे भारतसारख्या प्रिमीयम गाड्या रूळांवर आणण्यास भर देत आहे. तर देशातील लोकप्रतिनिधींना आधुनिक आणि प्रगत भारत घडवायचा आहे. मात्र या आधुनिक भारतात वंदे भारत एक्सप्रेस रिकाम्या जात असतिल आणि सामान्य प्रवासी असे चिरडले जात असतिल तर अश्या आधुनिकतेचा काय उपयोग?
Vision Abroad