Maharashtra Assembly Election:महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या १.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २.२५ टक्के इतके होते.
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उत्तरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. गेल्या निवडणुकीत एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनाही कल्याण ग्रामीण
मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला.
मनसेच्या मतांचा टक्का घसरला
मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ५.७१ टक्के मते मिळाली होती. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का ३.१५ टक्क्यांवर घसरला. सन २०१९च्या निवडणुकीत हाच टक्का अवघा २.२५ टक्के राहिला. यंदा त्यात आणखी घट झाली असून मनसेचा जनाधार आता अवघ्या १.५५ टक्के इतका तुटपुंजा आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad