Central Railway:घाटमाथ्यावर पडणाऱ्या दाट धुक्याचा परिणाम आता उपनगरीय रेल्वे गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांवर होत आहे. गर्द धुक्यांमुळे कर्जत, कसारा, खोपोलीहून सुटणाऱ्या लोकल आणि लोणावळा-खंडाळा, इगतपूरी कर्जत, खोपोलीहून सुटणाऱ्या लोकलचा वेग मंदावला असून या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. शनिवारी सकाळच्या सत्रातील रेल्वे सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या
यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच दाट धुके रुळांवर आले आहे.कर्जत, कसारा, खोपोली आणि लोणावळा-खंडाळा घाटामार्गावरील रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात धुके आल्याने प्रवासी सुरक्षेसाठी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. सध्या नियोजित वेगापेक्षा कमी वेगाने रेल्वे गाड्या धावत आहेत. देशभरातून इगतपुरी आणि लोणावळा-खंडाळा घाटात ये-जा करणाऱ्या सकाळच्या सत्रातील सर्वच रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे रेल्वे गाळ्या सुमारे २५ ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुळांवरील गस्त वाढली
कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांचे प्रसरण होऊन त्यांना तडा जाण्याच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी रुळांवरील गस्त वाढवण्यात आली आहे. रुळ सामान्य स्थितीत न आढळल्यास ब्लॉक घेऊन रुळांची देखभाल केली जाते. अद्याप थंडीमुळे रुळांला तडा गेल्याची कोणतीही घटनेची नोंद झालेली नाही. त्याचबरोबर दाट धुक्यांमुळे उपनगरी रेल्वे फेच्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत. सद्यस्थितीत कल्याण ते कसारा आणि कल्याण ते खोपोलीसह लोणावळा, संकी हिल, नागनाथ, ठाकूरवाडी, इगतपुरी येथील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Facebook Comments Box