Konkan Railway: पहाटेच्यावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकाजवळ काहीजणांनी शेकोटी पेटविली होती. त्या शेकोटीची धग रेल्वेची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या केबलला लागून संपूर्ण केबल जळाल्याने गोव्यातून बाहेरच्या राज्यांना संपर्कासाठी वापरली जाणारी यंत्रणा तब्बल चार तास कोलमडली.
यात रेल्वेच्या संदेशवहन प्रणालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकण रेल्वे स्थानकाच्या आवाराबाहेर हा प्रकार घडला. या भागात रेल्वे स्थानकावर काम करणारे काही हमाल राहतात. याच हमालाच्या एका ग्रुपने ही शेकोटी पेटविली होती. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्ग तसेच दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावरील कित्येक रेल्वेगाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवल्या. शेवटी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे कवच देऊन या रेलगाड्या हळूहळू मार्गस्थ केल्या.
यासंदर्भात कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, चार तासांच्या अथक परिश्रमानंतर सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केली. मात्र, त्यामुळे काही रेल्वे उशिरा धावल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मडगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, अद्याप कुणाच्याही विरोधात तक्रार नोंदविलेली नाही, असे सांगण्यात आले.
Facebook Comments Box
Vision Abroad