रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर स्थानकांवर गाड्या थांबवण्याबाबत अनेक मागण्यांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. गाड्यांच्या थांब्यांबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेत असते. त्यामुळे आम्ही रेल्वे मंत्रालयाकडे हे प्रस्ताव सादर केले आहेत. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी दादरपर्यंत नेण्याचा निर्णय मध्यरेल्वेचा आहे. ही गाडी दादरपर्यंत गेली तर आम्हाला निश्चितच आनंद होईल असे, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण म्हणजे ७४० किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण गेल्यावर्षी पूर्ण झाले असल्याने कोकण रेल्वे ही देशात १०० टके ग्रीन रेल्वे झाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली. विद्युतीकरणामुळे डिझेलच्या तुलनेमध्ये दर वर्षाला जवळपास १९० कोटी रुपयांची बचत होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोकण रेल्वेला आता २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वे उभारणीचा कालावधी पकडला तर तो काळ ३३ वर्षांचा आहे. गेल्या वित्तीय वर्षामध्ये कोकण रेल्वेला 301 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा नफा रेल्वे वाहतूक आणि प्रकल्प उभारणीतून झाला आहे. कोकण रेल्वे केवळ ६४४ किमी रेल्वेमार्गापुरती आता मर्यादित राहिली नसून रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून कोकण रेल्वे देशातील 16 राज्यांमध्ये काम करत असल्याचा अभिमान कोकण त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आज रत्नागिरीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोकण रेल्वेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. कोकण रेल्वेने जम्मूमध्ये १९ हजार कोटी रुपयांचे कटरा-उधमपूर येथे रेल्वेमार्गाचे यशस्वी काम केले आहे. या मार्गावर १६ बोगदे आणि २२ रेल्वेपूल आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेला चिनाब रेल्वेपूल कोकण रेल्वेने उभारलेला आहे. तसेच एनजी रेल्वेपूल केबलवर उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वे नेपाळ आणि नैरोबीमध्येही काम करत असल्याचे झा यांनी सांगितले.
प्रवासी सुविधांमध्ये कोकण रेल्वेने लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी विभागामध्ये खेड तसेच चिपळूण येथे सर्व कॅटेगिरीतील प्रवाशांसाठी एक्झिक्यूटिव्ह लाऊंज ही सुविधा पुरवली आहे. पुढील प्रत्येक वर्षी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर वर्षी सात ते आठ एक्झिक्युटिव्ह लाऊंज निर्माण केले जाणार आहेत.यावेळी मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता आर नागदत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते.
Facebook Comments Box