



Konkan Railway: या महिन्यात दरम्यान तेजस एक्सप्रेस किंवा जन शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरु असलेल्या प्लॅटफॉर्म अपग्रेडेशनमुळे या दोन्ही गाड्या दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सीएसएमटीऐवजी दादर पर्यंतच धावणार आहेत.
सध्या, तेजस एक्सप्रेस (ट्रेन क्र. 22120) आणि जन शताब्दी एक्सप्रेस (ट्रेन क्र. 12051), ज्या सीएसएमटी येथून प्रवास सुरु करतात आणि संपवतात त्यांचे अंतिम स्थानक काही कालावधीसाठी दादर असणार आहे. हा तात्पुरता बदल 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. त्यानंतर, गाड्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणाहून सुटतील आणि थांबतील. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची. याशिवाय, मुंबईत (Mumbai) येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या अंतिम ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल, जसे की लोकल ट्रेन, टॅक्सी किंवा इतर वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागेल.