



सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील तुतारी एक्सप्रेसच्या प्रवाशांची होणारी गैरसोय आता दूर होणार असून तीन नंबर प्लॅटफॉर्मलगत पक्का डांबरी रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून ओव्हरब्रिज ओलांडून तीन नंबर प्लॅटफॉर्मवर येण्याची गैरसोय दूर होणार असून प्रवाशांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात विशेषतः सावंतवाडी ते दादर जाणारी तुतारी एक्सप्रेस ही तीन नंबर प्लॅटफॉर्मवर थांबवली जाते. त्यामुळे या गाडीतून ये जा करणारे प्रवासी व त्यांचे नातेवाईक यांची गैरसोय होत होती. रेल्वे स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरून तीन नंबरवर जाण्यासाठी प्रवाशांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सामानासह ओव्हर ब्रिजवर चढण्याची व उतरण्याची कसरत करावी लागत होती. विशेषतः अंध, अपंग तसेच वृद्ध व महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर काही प्रवासी खाजगी वाहने तसेच रिक्षाच्या माध्यमातून तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या पलीकडे असलेल्या कच्च्या रस्त्यावरुन जीवेघेणा प्रवास करीत त्या ठिकाणी पोहोचत असत त्यामुळे हा रस्ता पक्का व्हावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. मात्र ही जागा रेल्वेच्या ताब्यात असल्याने व कोकण रेल्वे बोर्डाकडून त्यावर खर्च घातला जात नसल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पुढाकार घेऊन सदरचा रस्ता पक्का करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी १७ लाख ७२ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात रस्त्याचा आकार मातीचा भरावा तसेच जीएसबी मटेरियलचा थर त्यानंतर खडीकरण व डांबरीकरण अशा स्वरूपात ही पक्की सडक निर्माण केली जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हा रस्ता करण्याचे काम केले जात आहे. सावंतवाडी येथील गणेश इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. तब्बल ७ मीटर रुंदीचा हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक १८५ ला जोडत असून कोकण रेल्वेच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मला समांतर असा हा रस्ता सावंतवाडी वेंगुर्ला रस्त्यालाही जोडला जाणार आहे. या रस्त्यावर असलेल्या ओहोळावर ३ मीटर लांबी व रुंदीचा बॉक्स सेल बांधण्यात येणार आहे. सद्या या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील भरावाचे तसेच जीएसबी मटेरियल पसरण्याचे काम वेगाने सुरु आहे. लवकरच हा रस्ता पूर्ण होणार असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच मळगाव शिवाजी चौक येथून रेल्वे फाटकातून निरवडेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना देखील फाटक पडल्यावर होणारा विलंब टाळण्यासाठी हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरु शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांमधून या रस्त्याबाबत समाधान व्यक्त होत आहे.