



सावंतवाडी, दि. १२ फेब्रु. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लागणार्या पाण्याची व्यवस्था, रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आरा खडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी लागणारा निधी रत्नसिंधू योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सावंतवाडी स्थानकावर लवकरच ठिकाणी रेल हॉटेल्स व रूम उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. सावंतवाडी- मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी दर्जेदार असे रेल हॉटेल व तुतारी रेल्वे रुळाच्या बाजूला नवे प्लॅटफॉर्म आणि छोट्या निवासी रूमची व्यवस्था करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या जागेची पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब , रेल्वेचे जे पी प्रकाश, श्री ए बी फुले, सुरज परब, सुनील परब ,श्री गाड , योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे आदी उपस्थित होते.