Konkan Railway: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक जात आहेत. भाविकांना या प्रवित्र स्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनाने देशातील सर्व रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सेवा चालविल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरसुद्धा महाकुंभमेळा विशेष २ गाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या गाड्या फक्त गोवा आणि दक्षिणेकडील भाविकांच्या सोयीसाठी चालविण्यात आल्या असून कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागातील भाविकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करून गोवा राज्यातील भाविकांना महाकुंभमेळ्यात सहभागी व्हावे याकरिता एक विशेष गाडी चालवली आहे. ही गाडी पूर्णपणे गोवा राज्यातील भाविकांसाठी चालविण्यात आली असल्याने इतर भागातील प्रवाशांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. तर उडुपी-चिकमंगळुरूचे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या मागणीनुसार उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष दुसऱ्या गाडीची घोषणा झाली. मात्र या गाडीला कोकण रेल्वे मार्गाच्या महाराष्ट्र विभागात थांबे देताना कंजुषी केली आहे. या गाडीला फक्त रत्नागिरी, चिपळूण आणि रोहा येथे थांबा देण्यात आला आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा देण्यात आलेला नाही. देण्यात आलेले थांबे हे पाणी भरण्यासाठी आणि तांत्रिक थांबे असल्याने ही गाडी सुद्धा कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागासाठी नसल्याचे सिद्ध झाले आहे.
मागणी करूनही गाडी नाही.
महाकुंभ मेळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालविण्यात यावी आणि तिला कोकण रेल्वे मार्गावरील सर्व महत्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले होते. मात्र त्याची दखल गेली नसल्याने समितीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींच्या मागणीलाही केराची टोपली
गोवा सरकारने महाकुंभमेळ्यासाठी सोडलेल्या विशेष गाडीला कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागात थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे पत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पाठविले होते. मात्र या मागणीची दखल अजूनपर्यंत रेल्वे मंत्र्यांनी घेतली नसल्याचे दिसते. एकीकडे इतर राज्यातील लोकप्रतिनिधींची विशेष गाड्यांची मागणी सहज मान्य होताना या विशेष गाडयांना महाराष्ट्रात साधे थांबे देण्याच्या साध्या मागणीकडे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न पडताना दिसत आहे.
या सर्व प्रकारामुळे कोकण रेल्वे नक्की कोणासाठी, कोकण रेल्वेवर कोणाचे वर्चस्व हे प्रश्न पडत आहेत.
Facebook Comments Box