



सिंधुदुर्ग: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, माजी मंत्रीआ णि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.
राजकोट किल्ल्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभा करण्यात येत आहे. शिवरायांच्याहा तातील तलवार २३ फुटांची असून चबुतऱ्याची उंची ३ मीटर असेल. पुतळा मजबूत करण्यासाठी ३.७० मीटरचा पाया तयार करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून असून पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची ९३ फुट असेल. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा अन् पायाच्या कामासाठी एम ५० हे हायग्रीड काँक्रीट वापरण्यात येत असून, आयआयटी मुंबईकडून
पुतळ्याचे डिझाईन बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे. ताशी २०० किमी वाऱ्याच्या वेगातही पुतळ्याला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या नोयडा येथील कारखान्यात ब्रान्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात असून राजकोट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचा पाया आणि चबुतरा बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.