



सिंधुदुर्ग: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री 1 वा.च्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. सुदैवाने रुग्णाला तात्काळ बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला.
गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रुग्णांना अन्य एका रुग्णवाहिकेने उपचारासाठी बांबोळीकडे नेण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका ही दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला -वजराठ येथील एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. मात्र, तो रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर चालत बाहेर आला. नेमकी कशामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतला हे समजू शकलेले नाही.