



वैभववाडी: वैभववाडी रेल्वे स्थानक येथे वैभववाडी रेल्वे कर्मचारीवृंद तर्फे काल सालाबादाप्रमाणे सत्यनारायण पूजा आणि शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वात मोठे आकर्षण ठरले ते सत्यनारायण पूजेच्या मखरासाठी केळीच्या खोडा आणि पानांपासून पूजेच्या मखरासाठी बनविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.
सावंतवाडीच्या निरवडे कोनापाल या गावातील आनंद यशवंत मेस्त्री या तरुणाने कल्पकतेने ही प्रतिमा साकारली होती. यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक मखर बनवले आहेत. त्याने श्री देव विठ्ठल, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच ईतर बर्याच कलाकृतींचे मखर बनवले आहेत आणि प्रशंसाही मिळवली आहे. एक छंद म्हणुन त्याने ही कला जोपासली आहे.
या उत्सवा दरम्यान दिवसभरात सत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री ९ वाजता रेंबो फ्रेंड सर्कल, कवठणी प्रस्तुत “गावय” या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी नारायण नाईक यांनी दिली.